" तुमचो पाट कोणाकडे आसता ?"
हा प्रश्न तुम्हाला थोडी तरी कोकणी पार्श्वभूमी नसेल तर सहसा कळणार नाही पण जो पक्का कोकणी असेल त्याच्यासाठी हा प्रश्न म्हणजे एका मोठ्या संभाषणाची सुरुवात असते.
'पाट देणे' हा एक खास कोकणी वाक्प्रचार आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. वास्तविक पाहता, पाट देणे ही वरवर सामान्य वाटणारी क्रिया पण कोकणी माणसाचं मन त्यात गुंतलं की तो उत्सवाचा भाग बनतो. साधारणपणे नागपंचमी झाली की पाट देण्याची ही लगबग सुरू होते. पाट कुणाकडे द्यायचा हे फिक्स असतं. वर्षानुवर्षे चालत आलेल्या परंपरेचा तो एक भाग असतो. हा पाट म्हणजे 'गणपतीचो पाट!' गावात ठराविक मूर्तिकार असतात, त्यांच्याकडे जाऊन गणपतीचा हा पाट देणे म्हणजे गणेशोत्सवाची चाहूल असते. याच पाटावर गणपतीची मूर्ती विराजमान होते. हा पाट खास गणपतीसाठीच राखीव असतो आणि दरवर्षी हा पाट देण्याचा सोहळा असाच घडत असतो.मूर्तिकाराला पाट देतानाच आपल्याला गणपतीबाप्पाची मूर्ती कशी हवी आणि केवढी मोठी हवी याचीही माहिती दिली जाते. काहीजणांकडे असणारी मूर्ती ही दरवर्षी एकाच स्वरुपात असते मात्र काहीजणांकडे वेगवेगळ्या रूपात पहायला मिळते. अनेकजण गणपतीसमोर विविध पौराणिक/सामाजिक देखावेही साकारतात. त्यासाठी तशी मागणी पेंटरकडे केली जाते. (काही ठिकाणी मुर्तीकाराला पेंटर असंही म्हणतात ) गणपतीशाळेत जाऊन हे गणपती मूर्तिकार रंगवत असताना पाहत बसणे ही लहानधाकट्यांसाठी मोठी पर्वणीच असते.
पाट देऊन झाल्यावर मग अजून एक प्रश्न पुन्हा कानावर पडतो,
" भित रंगयलास?"
सणासुदीसाठी आवश्यक असणारी नेहमीची साफसफाई केली जात असतानाच 'भिंत रंगवणे' हा एक अतिशय महत्वाचा भागही त्यात समाविष्ट असतो. प्रत्येकाच्या घरात गणपती ठेवायची जागा ठरलेली असते. लाकडी टेबल किंवा खास बांधून घेतलेला ओटा असतो तिथेच गणपतीची मूर्ती बसणार असते. ( 'गणपती बसणे' हाही आमच्याकडचा एक खास वाक्प्रचार आहे. ) जिथे ही जागा असते त्या मागे म्हणजे गणपतीच्या मागे असणारी भिंत रंगवणे हादेखील एक महत्वाचा भाग असतो. 'रंगवणे' म्हणजे चित्र काढणे. पूर्वी, अनेकदा या ठिकाणी निसर्गचित्रच पहायला मिळत. अधिकतर, एखादा वाडेकरी (म्हणजे वाडीतच वास्तव्यास असणारा ) हे काम करत असे. हळूहळू यात बदल होऊन वेगवेगळी चित्रे येऊ लागली आता तर काहीजण चित्रं असलेला पडदाही लावतात पण ती भिंत रंगवण्याची आणि ती रंगवलेली पाहण्यात असणारी मजा वेगळीच असायची.
यानंतर असतो सर्वात आनंददायी भाग तो म्हणजे माटवी किंवा माटी बांधायचा. माटी म्हणजे लाकडी चौकट. गणपतीच्या आसनावरती ही लाकडी चौकट छतासारखी बांधलेली असते. माटी ही कोकणच्या गणेशोत्सवाचं एक महत्वाचं अंग आहे, ठळक वैशिष्ट्य आहे असं म्हणावं लागेल. माटी सजवणे म्हणजे सर्वप्रथम माटी खाली काढून साफ करणे इथपासून सुरू होते. या माटीला खास पावसाळ्यात उगवणारी विविध रानफळे, पत्री बांधली जातात. हरणं(छोटी पिवळी फुलं असणारी एक वनस्पती ), तेरडा, शेरवडा(पावसाळ्यातच दिसणारी एक खास वनस्पती), कांगला, काकडी, कवंडळा, नारळ, कच्च्या सुपारीची पेंडी (घोस) तसेच आंब्याचे टाळ (डहाळा), सावंतवाडीची लाकडी फळं इत्यादी माटवीळा बांधून माटवी सुशोभित केली जाते. ही फळं किंवा फुलं बाजारात विकत मिळत असली तरी आवाठात (म्हणजे वाडीत ) किंवा रानात फिरून ती गोळा करण्यात एक वेगळाच आनंद असतो.
यानंतर इतर सजावट केली जाते. तोरणं बांधणे, मखर बांधणे, लायटिंग करणे हे आवडीचे काम घरातील तसेच आजूबाजूची बाळगोपाळ मंडळी मोठ्या आनंदाने करतात. मातीची जमीन असेल तर शेणाने मस्त सारवून घेतली जाते. नंतर जमिनीवर मस्त रांगोळ्या काढल्या जातात. सर्व सजावटीमध्ये आणि एकूण भक्तिमय वातावरण करण्यामध्ये कोकणी माणूस कुठेही कसर सोडत नाही.
कोकणातील गणेशोत्सवाचं अजून एक सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे कोकणी माणूस कुठेही असला तरी तो 'गणपतीक गावाक येतलो म्हणजे येतलोच !' मुंबई-पुण्याहून 'चाकरमानी' गावी येतात. त्यासाठी चार-चार महिने अगोदर त्यांनी आरक्षण करून ठेवलेलं असतं. एक दोन दिवस अगोदरच ही मंडळी गावी दाखल होतात आणि त्यानंतर रंगणार्या गप्पा, पुढील प्लॅन्स , पेटार्या-बिटार्याची तयारी, गरंडेल इत्यादी फटाक्यांच्या सामानाबरोबरच विविध फळफळावळ, मोदकांचे बॉक्सेस ... काय आणि काय ! विचारू नका ! बाप्पा घरी येण्याआधी वातावरण असं अगदी 'बाप्पामय' होऊन जातं. एवढी सगळी जय्यत तयारी झाल्यावर मग सगळे मिळून बाप्पाची मूर्ती आणायला गणपतीशाळेत जातात. पाट दिल्याप्रमाणे आपापला गणपती शाळेतून घेतला जातो आणि मग डोक्यावर ती मूर्ती घेऊन (फार मोठी असेल तर मोठ्या गाडीतून ) वाजत गाजत "मोरयाsss मोरयाsss"च्या जयघोषात फटाके वाजवत घरी आणली जाते. शक्यतो आदल्या दिवशी मूर्ती आणली जाते ( क्वचितप्रसंगी गणेश चतुर्थीच्याच दिवशीही आणली जाते ) मग पहाटे लवकर उठून अंघोळी वगैरे वगैरे उरकून बाप्पाच्या पूजेची तयारी केली जाते आणि गुरुजी आले की त्यांच्या सुचनेनुसार सिद्धीविनायकाची यथासांग प्राणप्रतिष्ठापना केली जाते.
अस्या मृण्मयमुर्तौ प्राणप्रातिष्ठापने विनियोग :
|| एकदन्तं शूर्पकर्ण गजवक्त्र चतुभूर्जम् ||
|| पाशांकुशधरं देवं ध्यायेत सिद्धीविनायकम् ||
बाप्पाचं पूजन झाल्यावर घरातील सर्वजण बाप्पाचं दर्शन घेतात, फुले वाहतात आणि त्यानंतर आरती केली जात. आरती करतानाचा उत्साह बघण्यासारखा असतो टाळ तसेच टाळ्या कधी तबलाही वाजवून आरती केली जाते. मग प्रसाद वाटला जातो. कोकणात भजनी मंडळांची एक परंपरा आहे. गणपतीमध्ये ही भजनी मांडले घरोघरी भजने करतात आणि इथून पुढील काही दिवस घरोघरी गाणी, भजने, आरती या ना त्या मार्गे फक्त बाप्पा आणि बाप्पाचाच नामघोष सुरू असतो. त्यानंतर मात्र एकच वाक्य सगळीकडे ऐकू येत असतं,
"आमचो गणपती बघूक येवा हां !"
गणपती बाप्पा ssss
मोरया ssssssssssssssss
~ ©️अनिल विद्याधर आठलेकर
चेंदवण, ता.कुडाळ, जि. सिंधुदुर्ग
मोबाईल - 9762162942
गणेशचतुर्थी, २२ ऑगस्ट २०२०
No comments:
Post a Comment